महत्व द्रुष्टिकोनाचे

 

सकारात्मक द्रुष्टीकोनाची निर्मिती
(Development of Positive Attitude)




मित्रांनो, हे शिर्षक वाचून तुमच्या लक्षात आलंच असेल कि मला नक्की तुम्हाला काय सांगायचं आहे. नाही नाही मी कोणी मोठा मोटिवेशनल स्पीकर वगैरे आहे असे मुळीच समजू नका. मी पण तुमच्यासारखा एक साधारण व्यक्ती आहे. पण हा विषय निवडण्याचा माझा एकच उद्देश्य आहे तो म्हणजे मला गवसलेलं ज्ञान मला या ब्लॉगमार्फत लोकांपर्यंत पोहचविणे. चला तर मग आपल्या विषयाला सुरवात एका गोष्टीवरून करू.

एक फुगेवाला जत्रेमध्ये फुगे विकून उदरनिर्वाह करायचा. त्याच्याकडे लाल, निळे, पिवळे, हिरवे असे विविध रंगाचे फुगे असायचे. कधी त्याचा धंदा जास्त होई कधी कमी होई तर कधी समाधानकारक होई. विक्री कमी होऊ लागली कि एखादा फुगा तो सिलींडरमधून हेलियम वायू भरुन हवेत सोडायचा. उंच उंच जाणारा फुगा बघून मुलांना गम्मत वाटे आणि ती फुगे घेण्यासाठी गर्दी करत आणि मग त्याचा धंदा परत जोरात सुरु होई.असंच एकदा फुगे विकताना फुगेवाल्याच्या लक्षात आलं की कोणीतरी आपला सदरा मागून ओढतंय. त्यानं मागे वळून पाहिलं तर तिथं एक लहान मुलगा उभा होता. त्या मुलानं त्याला विचारला, "काका, काळ्या रंगाचा फुगा हवेत सोडला तर तो सुद्धा उडेल का?" मुलाच्या जिज्ञासेचं त्याला कौतुक वाटलं आणि त्यानं मोठ्या प्रेमानं उत्तर दिलं, "बाळ, फुगा रंगामुळे उडत नाही, तर त्याच्या आत जे काही आहे त्यामुळे तो हवेत उंचच उंच जातो."

मित्रानो, खरंतर हि गोष्ट आपल्या दैनंदिन आयुष्यालाही लागू पडते. आपल्या अंतरंगात जे काही असते त्यामुळे आपण उंचीवर जातो. अंतरंगातील हि गोष्ट म्हणजे आपला द्रुष्टीकोन, आपली मनोवृत्ती! काही विशिष्ट व्यक्ती, संस्था, कंपनी किंवा देश हेच अतिशय यशस्वी का झाले असतील याचा आपण कधी विचार केला आहे का? जगभरातील एकूण १००% लोकांपैकी फक्त % ते १०% लोकंच का यशस्वी झाले असतील याचा आपण कधी विचार केला आहे का? नाही ना ? मग आता आपण यावर विचार करू. त्या आधी आपण आपल्या आयुष्यात द्रुष्टिकोनाला किती महत्व आहे? हे समजून घेऊ.

 प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात द्रुष्टीकोनाला अनन्यसाधारण महत्व आहे. कोणतीही गोष्ट करणे - करणे, वस्तू घेणं- घेणं वगैरे कोणत्याही निर्णयाबाबतीत आपला द्रुष्टीकोन महत्वाचा असतो. वरीलप्रमाणे एखादी व्यक्ती यशस्वी - अपयशी होणं हे त्याच्या अंतरंगातील द्रुष्टीकोनावर अवलंबून आहे. तुमच्या यशाला तुमचा द्रुष्टीकोन कारणीभूत असतो. ज्याप्रमाणे एका मजबूत इमारतीसाठी मजबूत पाया हवा असतो त्यासाठी यशस्वी होण्यासाठीही मजबूत पायाची नितांत आवश्यकता असते. हा पाया म्हणजेच आपला द्रुष्टीकोन होय! मनुष्यात द्रुष्टीकोन दोन प्रकारचे असतात. सकारात्मक द्रुष्टीकोन आणि नकारात्मक द्रुष्टीकोन. आपण या दोन्ही द्रुष्टीकोनांमधील फरक एकत्र जाणून घेऊ.

सकारात्मक द्रुष्टीकोनाची व्यक्ती अत्यंत आशावादी असते, तर नकारात्मक द्रुष्टीकोनाची व्यक्ती निराशावादी असते. सकारात्मक व्यक्ती "आपण यशस्वी होणारच" या सकारात्मक भूमिकेतून नेहमी काम करते, तर नकारात्मक व्यक्ती "हे आपल्याला जमणार नाही" हा विचार करून काम करणे टाळते. सकारात्मक विचार करणाऱ्याला अपयश म्हणजे यशाकडे नेणारी पायरी वाटते, तर नकारात्मक विचारामुळे हेच अपयश मार्गातला अडथळा बनते. सकारात्मक व्यक्ती योग्य तो निर्णय योग्य त्यावेळी योग्य त्या पद्धतीने घेतात, तर नकारात्मक व्यक्ती आपला निर्णय इतरांवर सोपवतात. सकारात्मक व्यक्तीकडे प्रत्येक समस्येवर उत्तर असते, तर नकारात्मक व्यक्ती प्रत्येक उत्तरावर नवी समस्या शोधून काढतो. सकारात्मक व्यक्ती म्हणतो, "हि गोष्ट कठीण असेल पण शक्य आहे", याउलट नकारात्मक व्यक्ती म्हणतो, "हे शक्य असेल पण फार कठीण आहे."

मित्रांनो हे सर्व तुम्हाला सांगण्याचा मुद्दा असा आहे जर तुमच्या आयुष्यात सकारात्मक द्रुष्टिकोनाला अग्रगण्य स्थान आहे तर तुम्ही योग्य आहात. पण नकारात्मक द्रुष्टीकोन असेल तर आजच आतापासून आपला द्रुष्टीकोन बदला. सकारात्मक द्रुष्टीकोनाचा शोध घ्या. नकारात्मक प्रभावापासून दूर राहा. सकारात्मक व्यक्ती शोधून त्यांना आपल्या आयुष्यात स्थान दया. सकारात्मक आत्मप्रतिष्ठा निर्माण करा. आपल्याला नकारात्मकतेने सुरुवात केलेल्या कामाचा निकाल सकारात्मक हवा असतो. हे कसे शक्य होईल. शेवटी आपण जे पेरले आहे तेच उगवणार. आपण ज्या द्रुष्टीकोनाने एखादया कामाची सुरुवात करतो ना त्याचा परिणाम आपल्याला त्या कामाच्या निकालात दिसून येतो.

सकारात्मक द्रुष्टीकोनाचे भरपूर फायदे आहेत पण नकारात्मक द्रुष्टीकोनाचे वाईट परिणाम आपल्याला समाजात पाहावयास मिळतात. या नकारात्मक द्रुष्टीकोनामुळे पूर्वी समाजातील काही निर्दयी व्यक्ती आम्हाला वंशाचा दिवा हवा म्हणून घरातील स्त्री गरोदर राहिली कि मुलगा होईल कि मुलगी या शंकेने त्या स्त्रीचे लिंगपरीक्षण करत. गर्भात मुलगा असेल तर ठीक आणि मुलगी असेल तर त्या स्त्रीचे लगेच गर्भपातीकरण केले जायी म्हणजेच त्या गर्भातल्या त्या निष्पाप जीवाचा जगण्याचा अधिकार तो जन्माला येण्याअगोदरच त्याच्यापासून हिरावून घेतला जाई. जरी तिने जन्म घेतला तरी तिच्याकडे नकारात्मक द्रुष्टीकोनातुन पाहिले जायी. आजही अशी वस्तुस्तिथी आपल्या समाजात अशिक्षित लोकांमध्ये आढळून येते. यांना बायको हवी, बहीण हवी, आई हवी पण मुलगी नको. असं का? नकारात्मकतेमुळे एखाद्या स्त्रीला मुलगा होत नसेल म्हणजेच सतत मुलगी होत असेल तर त्या स्त्रीचा अमानुष छळ केला जातो. पण एखाद्या स्त्रीला मुलगा-मुलगी होणे हे त्या एकट्या स्त्रीवर अवलंबून नसून स्त्री पुरुष दोघांवर अवलंबून असते हे जाणून घेण्याचा कोणी प्रयत्नच करत नाही. याच विषयाचा जर सकारात्मक द्रुष्टिकोनाने विचार केला तर मुलींमध्ये आपल्याला देवीचे रूप दिसते. आज मुली भरपूर शिक्षण घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रात मुलांबरोबर खांद्याला खांदा लावून काम करत आहेत.

मित्रांनो, सर्व शक्य आहे पण आपला द्रुष्टीकोन सकारात्मक असणे खूप गरजेचं आहे. हार्वर्ड विद्यापीठातील विल्यम जेम्स म्हणतात, "आजच्या काळात माणसाला एक मोठंच सत्य गवसलं आहे आणि ते म्हणजे आपल्या द्रुष्टीकोनात बदल करून आपले आयुष्यच माणूस बदलू शकतो."  आपला द्रुष्टीकोन योग्य असेल तर चांगल्या संधी आपल्याला पावलोपावली दिसू लागतात. फक्त अश्या संधी ओळखून आणि आवश्यक ती कृती लगेच करून त्या संधीचे सोने करता यायला हवं. मित्रांनो एकदा आलेली संधी पुन्हा दुसऱ्यांदा दार ठोठावत नाही. येणारी संधी चांगली किंवा वाईट असू शकते; पण ती पूर्वीसारखी कधीच नसते. म्हणून योग्य वेळी योग्य निर्णय घेणं महत्वाचे आहे.

मित्रांनो, या विषयावर लिहिण्यासारखं भरपूर आहे. शेवटी तुम्हाआम्हाला वेळेचं बंधन आहेच. म्हणून शक्य होईल तेवढ्या थोडक्यात आणि सोप्या शब्दांत मी हा विषय ब्लॉगमार्फत तुमच्यासमोर मांडला आहे. मला नाही माहित कि, माझा हा ब्लॉग किती लोकांना आवडेल? पण हा ब्लॉग वाचून जर कोणी एखाद्या व्यक्तीच्या विचारात सकारात्मकतेची भर पडली तरी मी माझा हा ब्लॉग लिहिण्यामागचा हेतू पूर्ण झाला असं समजेन. तरीदेखील हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला (वाईट/चांगला)? हे कंमेंट करून नक्की सांगा. लिखाणात काही चूक झाली असेल, नकळत कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व ! धन्यवाद....

 


टिप्पण्या